ठाणे - ठाण्यातील बाळकुम येथे कोरोना रुग्णांसाठी १० मजली रुग्णालय बांधण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कोविड रुग्णालयाचा ई- लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, आयुक्त विजय सिंघल व इतर मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा यासाठी बाळकुम-साकेत येथे १ हजार २४ खाटां(बेड)चे १० मजली रुग्णालय उभारण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एमसीएचआय, क्रेडाई ठाणे युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व सुविधांनीयुक्त असलेले कोविड रुग्णालय ठाणेकरांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. या रूग्णालयामध्ये एकूण १ हजार २४ खाटा आहेत. यातील ५०० खाटांना सेंट्रल ऑक्सीजनची सुविधा आहे. यातील ७६ खाटा आयसीयूसाठी असून १० खाटा डायलिसीस रूग्णांसाठी, १० खाटा ट्राइएज(तत्काळ उपचार)साठी ठेवण्यात आल्या आहेत. या इमारतीच्या तळ मजल्यावरदेखील 24 आयसीयू खाटा, 10 खाटा कोविड डायलिसिस रुग्णांसाठी, १० खाटा ट्राइएजसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर प्रत्येकी 26 आयसीयू आणि 119 ऑक्सीजन सुविधा असलेल्या खाटा आहेत. तर चौथ्या मजल्यावर 155 ऑक्सीजन सुविधेच्या खाटा आहेत. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर प्रत्येकी 155 साधे बेड उपलब्ध आहेत. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर 69, आठव्या मजल्यावर 67, नवव्या मजल्यावर 67 आणि दहाव्या मजल्यावर 22 खाटा आहेत. आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयामध्ये अतिरिक्त 300 रुग्णांचीही व्यवस्था करता येऊ शकते.
या रुग्णालयामध्ये कोविड लॅबचीही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असून भोजन, रूग्णांना युनिफार्म, पॅथालॉजी लॅब, एक्स रे, कोरोना टेस्टींग लॅब आणि मनोरंजनासाठी टीव्ही आणि लाकर्सचीही सुविधा येथे उपलब्ध आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आलेले हे रुग्णालय रूग्णांच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य ठरणार आहे. 1 हजार किलोवॅट क्षमतेच्या जनरेटर्सची सुविधाही निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरोना रुग्णांवर या ठिकाणी उपचार करणे शक्य होणार आहे, असे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कळवा-मुंब्रामध्ये देखील अशाच अद्ययावत रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कळव्यासाठी ७०० आणि मुंब्र्यासाठी ६०० बेड्चे रुग्णालय लवकरच तयार होणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.