नवी मुंबई - पुण्याचे पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे यांनी तळोजा परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केला होता. यासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. मात्र, निशिकांत मोरेला या प्रकरणी अटक झाली नाही. तसेच त्याला पोलिसांच्या माध्यमातून फरार घोषित करण्यात आले आहे. पोलिसांच्या माध्यमातून मिळत असलेल्या थंड प्रतिसादामुळे पीडित मुलीने सुसाईड नोट लिहिली आहे. तसेच पीडिता सोमवारपासून घरातून गायब आहे. याप्रकरणी मुलींच्या भावाने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पीडित मुलीच्या आईच कपड्याचे दुकान निशिकांत मोरे यांच्या पत्नीचे ब्युटी पार्लर खारघर परिसरात शेजारी होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबात मैत्री झाली. एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले होते. पीडित मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निशिकांत मोरे यांनी मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी मोरे हे उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असल्याने या प्रकरणाची पोलीस दखल घेत नव्हते.
हेही वाचा - अवकाळी मदतीबाबत केंद्राकडून राज्याची बोळवण; मागणीपेक्षा 12 हजार 939 कोटी कमी
वाढदिवसाच्या घटनेसंदर्भात मुलीच्या पालकांनी प्रत्येक ठिकाणी दखल मागितली. मात्र, गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. मुलीच्या पालकांना धमकावण्यातही आले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. खारघर मधील शिल्प चौकमधून आमच्या मुलीला पळवून नेण्याचा मोरे यांच्या कुटुंबातील लोकांचा डाव होता, असाही आरोप पीडित मुलीचे वडील आणि भावाने लावला होता. पीडित मुलगी 12 वी मध्ये शिकत आहे. संबधित शाळा निशिकांत मोरे यांच्या इमारतीच्या अगदी शेजारी आहे. पीडित मुलगी परवा बऱ्याच दिवसांनी शाळेत गेली होती. मात्र, शाळेतून आल्यावर ती घरी कुणाशीही बोलली नाही. ती गप्प का आहे, याबद्दल मुलीच्या पालकांनी तिला विचारले. मात्र, तिने काहीही सांगितले नाही. पीडित मुलीची दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने ती रात्री उशिरापर्यंत बेडरूममध्ये अभ्यास करत बसली होती. रात्री साडे तीनच्या दरम्यान मुलगी घरात नसल्याचे मुलीच्या वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी मुलीच्या भावाला उठवले.
हेही वाचा - ठाणे : शिळ फाटा येथे आगीत 13 गोडाऊन जळून खाक
बेडरूममध्ये मुलगी अभ्यास करत होती त्या टेबलवर मुलीने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. मुलीच्या पालकांनी तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, ती कुठेही सापडली नाही. 'मी माझं या पुढील आयुष्य नीट हाताळू शकत नाही. मला न्याय मिळत नसल्याने मी माझे आयुष्य संपवून टाकत आहे व रेल्वे रुळावर जाऊन मी जीव देत आहे. मी डीआयजी मोरे यांच्या दबावाखाली येऊन ही आत्महत्या करीत आहे', असा उल्लेख मुलीने त्या चिठ्ठीत केला आहे. याप्रकरणी, तळोजा पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. डीआयजी मोरे प्रकरणामुळे होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आमची मुलगी आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडली आहे, असा आरोप मुलीच्या पालकांनी लावला आहे.