ठाणे : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेल्या गोमघर या लहानशा गावातली मोहिनी ही शेतकरी कुटुंबातली एक तरुणी आहे. आई – वडील शेती आणि मजुरी करून कसेबसे घर चालवायचे. सात भावंडांमधून मोहिनी ही पाचवी मुलगी आहे. मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ या ठिकाणी असलेल्या आश्रमशाळेत तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. मोहिनीला शिकण्याची फार जिद्द होती मात्र परस्थिती नसल्याने आईवडीलांनी १२ वी नंतर तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर ती मुलुंड येथे राह्यला आली. मात्र नशिबाने मोहिनीच्या पुढ्यात काहीतरी वेगळेच मांडून ठेवले होते. अवघ्या एका वर्षातच तिच्या पतीचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मोहिनी त्यावेळी तीन महिन्याची गर्भवती होती. नुकत्याच उमलत असलेल्या तिच्या संसारावर काळाने घाला घातला. एकीकडे मातृत्वाची जबाबदारी तर दुसरीकडे पतीच्या निधनाचे आभाळाएवढे दु:ख. मोहिनी पूर्ण कोलमडून गेली होती. यावेळी समाजाने तिला अनेक सल्ले दिले मात्र संस्कारक्षम असलेल्या मोहिनीने आता स्वत:च स्वत:साठी उभे राहयचे असे ठरवले. पतीच्या निधनानंतर वृद्ध सासूची आणि आपल्या होणाऱ्या बाळाचीही पूर्ण जबादारी आता मोहिनीवरच आली होती. मग घर चालवण्यासाठी ती धुणी भांडीची काम करू लागली.
असा घडला मोहिनीचा सरकारी नोकरीचा अथक प्रवास : हे सुरु असतानाच आपल्या परस्थितिला आपल्याला बदलायचे आहे, हे कुठेतरी तिच्या मनात सतत चालू होते. पोलीस होण्याचे तिचे लहानपणापासूनच स्वप्न होते. मात्र शिक्षणाचा अभाव असलेल्या तिच्या आजूबाजूच्या वातावरणात तिला योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळू शकले नाही. अशातच तिला जिजाऊ संस्थेच्या वतीने ठाण्यात मोफत सुरु असलेल्या पोलीस अकॅडमीबद्दल कळले. तीने त्या ठिकाणी प्रवेश घेतला मात्र आपल्या पोटासाठी करत असलेल्या घरकामाच्या कामातून आणि लहान बाळाच्या जबाबदारीमुळे रोजच्या रोज वर्गाला उपस्थित होणे कठीण झाले. ती सतत गैरहजर राहू लागली. जिजाऊ संस्थेने याबाबत तिला अधिक विचारणा केल्यानंतर तिची एकंदरीत परिस्थिती त्यांना समजली. त्यानंतर जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांनी तिच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. तिला ते घरकाम सोडायला सांगत संपूर्ण लक्ष अभ्यास आणि ट्रेनिंगवर देण्यास सांगितले. यावेळी मोहिनीच्या सासुबाईनी तिला खूप सांभाळून घेत भावनिक आधार दिला. स्वत: घर काम करून तिच्या बाळाचा, घराचा सांभाळ केला. तू नक्की काहीतरी करू शकशील ही प्रेरणा तिला दिली.
अग्निशामक दलाच्या भरतीमध्ये मोहीनीची निवड : जिजाऊ संस्थेने यावेळी या जिद्दी मुलीला तिचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचा ठाम निश्चय केला. मोहिनीची जिद्द आणि जिजाऊचे बळ या जोरावर तिने आपले प्रशिक्षण पूर्ण केले. जिजाऊ संस्था ही आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपली काळजी घेत होती, हे मोहिनी आवर्जून सांगते. नुकत्याच झालेल्या मुंबई अग्निशामक दलाच्या भरतीमध्ये मोहीनीची निवड झाली आहे. त्यामुळे तिच्यासह तिच्या घरात त्याचप्रमाणे जिजाऊ संस्थेच्या संपूर्ण टीममध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे. आपण हे स्वप्न केवळ जिजाऊ संस्था आणि वडिलांसारखे काळजी घेणारे संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्यामुळेच पूर्ण करू शकले, हे सांगताना मोहिनीच्या डोळ्यांच्या कडा आपोआपच ओलावतात. यावेळी आपल्या लहानशा आधाराने मोहिनीसारखी अनेक लेकरे आपली स्वप्न पूर्ण करतात, तेव्हा आमच्या जिजाऊ संस्थेचा, परिवाराचा खूप अभिमान वाटतो. अशा संघर्ष करणाऱ्या मुलांसाठी जिजाऊ नेहमीच सोबत असेल, असे जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांनी सांगितले. मोहिनीसारख्या अनेक मुला- मुलींच्या आयुष्यात जिजाऊने दिलेले बळ, प्रेरणा आणि पाठबळ हे क्रांतिकारी बदल घडवत आहेत. मोहिनीसह आणखी ५० हून अधिक विद्यार्थ्यांची या नुकत्याच पार पडलेल्या अग्नीशामक भरतीमध्ये निवड झाली आहे.
जिजाऊचे सामाजिक कार्य मोठे : गरीब कुटुंबातील आदिवासी वाड्या वस्त्यांतील मुलं ही केवळ शिकून शिपाई म्हणून नोकरीला न लागता अधिकारी झाली पाहिजेत. ही मोठी आणि प्रामाणिक महत्वकांक्षा घेऊन आज जिजाऊ संस्था ठाणे, पालघर आणि कोकण भागांत दिवसरात्र कार्य करत आहे. शिक्षण, आरोग्य , रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर काम करणाऱ्या जिजाऊ संस्थेने आज डोंगराएवढे सामाजिक कार्य या भागात उभे केले आहे. येथील दुर्गम भागात आज संस्थेच्या ८ सीबीएससी शाळा आहेत, ज्या गोरगरीबांसाठी अगदी मोफत चालवल्या जातात. १३० बेड्सचे अद्यावत रुग्णालय विनामुल्य चालवले जात आहे. तर एकूण ४३ ठिकाणी संस्थेच्यावतीने मोफत चालवण्यात येत असलेल्या Upsc/ mpsc च्या अकॅडमीमधून ५०० च्यावर अधिकारी घडले आहेत . १५० हून अधिक तरुण - तरुणी पोलीस खात्यात नोकरीस लागले आहेत. त्यामुळे जिजाऊ संस्था ही समाजात क्रांतीकारी बदल घडवणारी एकमेव संस्था असल्याचे आता समाजातून बोलले जात आहे.
- हेही वाचा : Nitesh Rane criticize Sanjay Raut : '..म्हणून संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकार पाडले', नितेश राणेंचा गंभीर आरोप
- हेही वाचा : Raj Thackeray Taunt BJP : कर्नाटक निवडणुकीत 'भारत जोडो' यात्रेचा परिणाम; राज ठाकरेंचा भाजपला टोला
- हेही वाचा : Karnataka Congress : कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? आज विधिमंडळ पक्षाची बैठक