ठाणे - सराईत चोरटा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांमध्ये झालेला झटापटीचा थरार डोंबिवलीकरांनी अनुभवला. गुन्हे शाखेच्या कल्याण युनीटने एका सराईत आणि चपळ गुन्हेगाराचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या आणि डझनभर गुन्ह्यांच्या नोंदी असलेल्या या गुन्हेगाराकडून तब्बल सव्वा लाखांचे महागडे मोबाईल जप्त केले.
विशेष म्हणजे हा चोरटा मौजमजा आणि चैनीखातर रस्त्याने जाणाऱ्या वाटसरू, विशेषतः विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून धूम ठोकत असे. विजय आनंत भाकरे (वय २४) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीकरिता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील स्थानक परिसरात चोरलेले महागड्या कंपनीचे मोबाईल फोन कमी किमतीत विकण्यासाठी सराईत चोरटा येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्यानुसार एका पथकाने दुपारी २ वाजल्यापासून जाळे पसरवले होते. पोलिसांनी सापळा रचल्याची चाहूल लागताच चोरट्याने धूम ठोकली. मात्र, पोलिसांनी चपळाईने चोराला पकडले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याने कल्याणच्या विविध भागात घरफोडी केल्याची कबुली दिली. सदर आरोपी हा कल्याणच्या खडकपाडा पोलीस नोंदीमधील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली.