ठाणे - नवी मुंबईतील वाढती कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाहता 'मिशन ब्रेक द चेन' उपक्रम पालिकेमार्फत राबवण्यात येत आहे. त्यानुसार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मोबाइल डिस्पेन्सरी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नवी मुंबईतील नागरिकांनी मिशन झिरोचे उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'मिशन ब्रेक द चेन' अंतर्गत मोबाइल डिस्पेन्सरी सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोबाइल डिस्पेन्सरीत 6 प्रचार रथ असणार आहेत; जे या योजनेचा प्रचार करतील. 22 अँटीजेन टेस्ट व्हॅन असणार आहेत. शहरातील प्रत्येक सोसायटीत जाऊन नागरिकांच्या स्वॅब टेस्ट यामार्फत घेता येणार आहेत.
तर या टेस्टमध्ये कोणीही कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यास त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 4 रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवले असून कोरोनाची मूळ साखळी तोडण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी नागरिकांनी मनपाच्या स्तुत्य उपक्रमास सहकार्य करून मिशन झिरोचे उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.