ठाणे - खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत अंडी आणि कोंबडीला शाकाहारी घोषित करा, असे विधान केले होते. राज्यातील दुष्काळ, पाऊस, कोसळणाऱ्या इमारती यासारख्या गंभीर प्रश्नांवर चर्चा न करता कोंबडी, अंडी यासारख्या मुद्यांवर वेळ घालवल्याचे कारण देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाकाहारी अंड्याचे प्रतिकात्मक झाड लावून त्यांचा निषेध केला.
भारतात काही ठिकाणी आयुर्वेदिक अंडी आणि कोंबडी असल्याचा दाखला राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दिला होता. अंडी आणि कोंबडी शाकाहारी की मांसाहारी आहे? हे देखील आयुष मंत्रालयाने प्रामाणित करण्याची मागणी राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत केली होती. मात्र, डोंगरी येथे पडलेली इमारत, पावसामुळे अनेकांचे झालेले नुकसान, तिवरे धरण या सारखे गंभीर मुद्दे राज्यात असताना कोंबडी आणि अंडे हे शाकाहारी या मुद्दयांवर राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या काळात भाषणात वेळ घालवला. यासाठी ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या भाषणाचा निषेध करत झाडाला अंडी लावून, शाकाहारी झाड उगवून त्याला शाकाहारी अंडी आली आहे, असे म्हणत निषेध नोंदविला.
कोंबडीची अंडी शाकाहारी आहेत. त्यामुळे ही अंडी झाडाला देखील लागली आहेत. ठाण्यात मनसेच्या महेश कदम यांच्या ऑफिसमध्ये अंड्याचे झाड उगविले आणि ते संजय राऊत यांना पाठवणार असल्याचे सांगत महेश कदम यांनी हे निषेध आंदोलन केले.