ठाणे- मीरारोड पूर्वमधील प्रभाग समिती क्रमांक ६च्या कार्यालयात प्रभाग अधिकारी यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कार्यालयात मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन गोंधळ घातला व ही घटना मोबाईलद्वारे फेसबुकवर लाईव्ह आणत कार्यालयात दारूची पार्टी सुरू आहे, असा आरोप केला.
काल (१६ ऑगस्ट) दुपारी ४ च्या सुमारास काही मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रभाग समिती कार्यालय गाठले. त्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ चालवला. त्यात मीरारोडच्या रामनगर येथील प्रभाग कार्यालयात दारूची पार्टी सुरू असल्याचा त्याने आरोप केला. आम्ही कार्यालयात आल्यामुळे दारूची बाटली व ग्लास फेकून देण्यात आले, असा आरोप व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्याने केला. त्याचबरोबर, त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. कार्यकर्त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना, तुमचा चेहरा लोकांना दाखवा असे म्हणत त्यांच्या तोंडावर लावलेला मास्क खेचला. यावेळी प्रभाग अधिकाऱ्यांनी विरोध केला असता काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी उपस्थित असलेल्या काही जणांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. हे सर्व फेसबुकवर लाईव्ह चालू होते. त्यामुळे, शहरात चर्चेला उधाण आले आहे, तर घडलेल्या प्रकारामुळे शहरातील मनपा कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
अधिकाऱ्यांनी विनंती केली तरीही केली मारहाण..
शहरात प्रभाग अधिकाऱ्यांवर अनेक वेळा हल्ले झालेले आहेत, पण या प्रकाराची घटना शहरात पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांची मुजोरी व दादागिरी वाढल्याचे मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. ही घटना घडली त्यावेळी कार्यलयात प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे, नरेंद्र चव्हाण, निवृत्त अधिकारी दादासाहेब खेत्रे उपस्थित होते. त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, आम्ही दारू पिलेली नाही, तसा काही प्रकार नाही, कोणतीही पार्टी केली नाही, वाटल्यास आमची वैद्यकीय चाचणी करा. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी आयुक्तांना फोन लावला व नंतर पोलिसांना पाचारण केले.
निवेदन देण्यासाठी एकत्र बसलो होतो..
शीतल नगर येथील गटारात पडून मरण पावलेल्या तरुणाप्रकरणी प्रभाग अधिकाऱ्यांचा काहीही संबंध नसतानाही त्यांना दोषी धरण्यात येत आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन द्यायचे होते. ते बनवण्यासाठी आम्ही एकत्र येऊन निवेदन बनवत होतो, असे अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले, मात्र कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
दरम्यान, घटनेनंतर काशिमीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परस्थितीची पाहणी करून तिथे असलेल्या सर्वांना ठाण्यात नेले व पालिका अधिकाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पालिका रुग्णालयात पाठवण्यात आले. तसचे, कार्यालयात दारू पिण्यात आली, याबाबत कोणताही पुरावा पोलिसांना आढळून आला नाही. अधिकाऱ्यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलीस सुत्रांकडून समजले आहे.
हेही वाचा- लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीची झाडाला लटकवून हत्या, विकृत प्रियकर गजाआड