नवी मुंबई : ठाणे ते पनवेल धावणाऱ्या लोकल सेवा सुरू आहेत. परंतु, या लोकल ट्रेन ऐरोली रेल्वे स्टेशनवर थांबत नाहीत. या संदर्भात नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली स्थानकात धरणे आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन बंद आहेत. अनलॉक जाहीर केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ऑफिसमध्ये जात आहेत. लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. ट्रेन बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मनसेच्या माध्यमातून सविनय कायदेभंग आंदोलन पुकारत लोकलमधून प्रवास करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला होता. आज पुन्हा नवी मुंबई मनसेचे मनसैनीक रस्त्यावर उतरले, व त्यांनी धरणे आंदोलन केले तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सर्व लोकल ट्रेन ऐरोली, रेल्वे स्थानकावर थांबल्या पाहिजे. या विषयावर निवेदन देण्यात आले.त्यानंतर, ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात खासदार राजन विचारे आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निदर्शने केली. पुढील 15 दिवसात रेल्वे ऐरोली स्थानकावर थांबल्या नाही तर, रेल रोको आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला.
यावेळी, बाळासाहेब शिंदे, नितीन लष्कर, महेश परब, प्रेम दुबे, चंद्रकांत डांगे, विश्वनाथ दळवी, प्रमोद मोरे, संतोष जाधव, निखिल थोरात, दशरथ सुरवसे, जमीर पटेल, सखाराम सकपाळ, दिलीप बेलुरे, संदीप सिंग इतर, मनसे सैनिक उपस्थित होते.