ठाणे - वागळे इस्टेट व इतर प्रभागांमध्ये गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारीवरून मनसेचे ठाणे व पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी मनसेच्या महिलांनी शहरातील गढूळ पाण्याचे नमुने बाटल्यांमध्ये भरून पालिकेत आणले होते.
सर्वजण अतिशय सावधपणे पालिकेत पोहोचले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही कळण्याच्या आतच आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यांच्या या पवित्र्याने सर्वच यंत्रणा हादरून गेली होती. या घटनेनंतर सहाय्यक आयुक्त यांनी तीन दिवसात स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन प्रसारमाध्यमांसमोर दिले आहे.
आंदोलनात पुष्कर विचारे, सुशांत सूर्यराव, अनिल म्हात्रे, संदीप पाचंगे, सुशांत डोंबे, रोहिणीताई निंबाळकर यांसह सर्व महिला सेना, विद्यार्थी सेना व मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
येत्या सहा दिवसात स्थानिकांना स्वच्छ पाणी मिळाले नाही तर मनसे पदाधिकारी सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना गढूळ पाणी पाजतील अशी धमकी यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष विश्वजित जाधव यांनी दिली.