ठाणे : कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांनी फुटपाथसह काही ठीकाणी रस्तावरच बस्थान मांडून फेरीवाले बसल्याचे पाहवयास मिळत आहे. विशेष म्हणजे मुजोर फेरीवाल्याकडून पालिका कर्मचारी किंवा नागरिकाला घेरून त्याच्याशी उद्धट वर्तन करत मारहाणीचे प्रकार गेल्या काही दिवसापासून वाढले आहेत. कल्याण डोंबिवली महापालीका प्रशासनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. आज मात्र ती मुदत संपली आहे. दरम्यान, मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत.
प्रश्न पुन्हा ऐरणीवर : डोंबिवली पूर्वेत सत्ताधारी असलेल्या एका माजी नगरसेवकाने फेरीवाला शुल्क वसुलीचा ठेका महापालिकेकडून घेतला आहे. फेरीवाले याच वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातून फेरीवाले हटणार नाहीत याची काळजी हा माजी नगरसेवक घेतो. या माजी नगरसेवकाला त्याच्या वरिष्ठ नेत्याचा सक्रिय पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच फेरीवाल्यांना स्टेशन परिसरात गर्दी करत वाहतुकीला अडथळा करण्यास रान मोकळे झाले असून स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
नोंदणी मोहिम : काही दिवसांपूर्वीच एका रुग्णवाहिका चालकाला फेरीवाल्यांनी बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले होते. त्यावेळी दोन फेरीवाल्यांविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. लॉकडाऊन पूर्वी महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांची अधिकृत नोंदणी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. यात 14 हजार 500 फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली होती.
मनसेचा इशारा : वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना सर्वेक्षणातून वगळण्यात आल्याचा आरोप फेरीवाला संघटनांकडून करण्यात आला होता. तर दुसरीकडे यादीत नाव असलेले अनेक फेरीवाले शोधूनही सापडत नसल्याचे प्रशासनाने त्यावेळी सांगितले होते. मात्र, आता मनसेने दिलेली मुदत संपल्यानंतर मनसेने स्टेशन परिसरात 'आता आमच्याकडे दुर्लक्ष करा' अशा आशयाचा बॅनर लावून फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेला दिलेला अल्टीमेटम संपला असता उद्यापासून आमच्या पद्धतीने आम्ही फेरीवाला हटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनसेने इशारा दिला.
अखेर त्यांनी काढला पळ : रेल्वे स्टेशन परिसराच्या 150 मीटरच्या परिसरात फेरीवाले असू नये, असा न्यायालयाचा आदेश आहे. मात्र तरीसुद्धा महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने आता मनसे आपल्या पद्धतीने स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करेल, असा इशारा मनसेने दिला. त्यामुळे बुधवारी फेरीवाल्याविरोधात खळखट्याक आंदोलनच्या भीतीने फेरीवाल्यांनी पळ काढला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचा विळखा पडला असल्याचे दिसून येते. प्रशासनाकडून कारवाई करण्याचा आव आणला जात असला तरी या कारवाईत सातत्य नसल्यामुळे फेरीवाल्यांची मुजोरी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई करताना सहानुभूती दाखविली जात असून पालिका प्रशासनाकडून फेरीवाला धोरणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच फेरीवाल्यांवर दिखाव्याची कारवाईत करत असल्याचे उघड होत आहे.
हेही वाचा : Death Of Poisoned Woman In Mumbai: खळबळजनक! मंत्रालयाकडून दाद न मिळाल्याने महिलेने घेतले विष; अखेर मृत्यू