ठाणे - उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या दुरवस्थेला येथील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. येथील पालकमंत्री हे माजी आरोग्यमंत्री, तसेच या भागातील खासदार-आमदार हे दोघेही डॉक्टर असून येथील शासकीय रुग्णालय हे विविध समस्येने ग्रासले असल्याचा आरोप करत मनसे सैनिकांनी शिवसेनेवर निशाणा साधला. यासोबतच रुग्णालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आणि रुग्णालयातील दुरवस्था सुधारावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा - मृत कोंबड्या ओढ्यात फेकल्याने पाणी दूषित; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
रुग्णालय परिसर व वार्डात पसरलेले घाणीचे साम्राज्य, सोयीसुविधांचा अभाव, डॉक्टरांची रिक्त पदे अशा विविध समस्यांच्या गर्दीत उल्हासनगरची आरोग्य सेवा अडकून पडली आहे. मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, कल्याण, अंबरनाथ शहरातून रुग्ण या ठिकाणी येत असतात. या मध्यवर्ती रुग्णालयात 'अ' वर्ग श्रेणीतील १६ डॉक्टरांपैकी फक्त ६ डॉक्टर उपलब्ध आहेत. वर्ग 'ब' मधील २९ डॉक्टरांपैकी ११ डॉक्टर रिक्तपद आहेत. तसेच ५ डॉक्टरांनी राजीनामाही दिला आहे. २०२ खाटांची मंजुरी असतानाही प्रत्यक्षात १२० ते १४० खाटाच येथे उपलब्ध आहेत. औषधांचा तुटवडा, MIR मशीन, एक्सरे मशीन उपलब्ध असतानाही अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या मशीन बंद पडून आहेत. रुग्णालयाला १२ वार्डची मंजुरी असताना फक्त ८ वार्डमध्ये काम चालत आहे. हे सर्व भयाण वास्तव शासकीय रुग्णालयातील असून येथील पालकमंत्री हे माजी आरोग्य मंत्री आहेत, खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा डॉक्टर आहेत.
हेही वाचा - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा तुटवडा, दोन वर्षातील उच्चांकी दर
आमदार बालाजी किणीकर हे सुद्धा डॉक्टर असताना येथील रुग्णालय अखेरचा श्वास घेत आहे. या सर्व भयाण वास्तवाबाबत मनसेच्या वतीने आज(मंगळवार) रुग्णालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच येत्या १५ दिवसात येथील दुरवस्था सुधारावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा - मानवी साखळीनंतर मनसेचे टोलमुक्तीसाठी धरणे आंदोलन