ठाणे - या वर्षी ठाण्यात एकाही रस्त्यावर खड्डे पडणार नाही, असे आश्वासन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. मात्र, पावसामुळे ठाण्यात रस्त्यांची चाळण झाली आहे. याचा निषेध नोंदवत मनसेने एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांचे चित्र चक्क खड्डेमय रस्त्यावर काढून अनोखे आंदोलन करत सरकारला चपराक लगावली आहे. हे पाहण्यासाठी ठाणेकर प्रचंड गर्दी करत आहेत.
ठाण्यातील निळकंठ सोसायटी परिसरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे चेहरे रंगविण्यात आले आहे. या खड्ड्यांमधून वाहन चालवताना ठाणेकरांना किती त्रास सहन करावा लागतो, त्याची झळ या मंत्र्यांना नसते. मात्र, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे उद्घाटन करताना फोटो काढायला पुढे असणारे हे मंत्री खड्डे पडल्यावर चेहरा लपवतात. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही रस्त्यातील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे चित्र काढले असल्याचे ठाणे जिल्हा मनविसेचे अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सांगितले.
या प्रकारानंतर तरी प्रशासनाला जाग येईल का हे माहीत नाही. पण, अशा पद्धतीने मंत्र्यांचे चित्र काढल्याने लोकांमध्ये खड्ड्याचे आकर्षण तर निर्माण झाले आहे.