ठाणे - कोरोनाच्या थैमानात पिचलेल्या जनतेला थकलेल्या हफ्त्यांसाठी बँकांनी तगादा लावू नये व त्यांना वाढीव मुदत द्यावी, अशा मागणीचे निवेदन मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले. बँक हफ्ते न भरल्याने कारवाई होत असल्याने मनसेने मागील लॉकडाऊन नंतर अनेक ठिकाणी तोडफोड करुन आंदोलने केली होती.
मागील वर्षी कोरोनाने भारतात शिरकाव केला आणि त्याचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात एखाद्या वणव्याप्रमाणे पसरला. शेकडो उद्योगधंदे आणि कारखाने बंद पडल्याने हजारो नागरिकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले. कोरोना होऊ नये यासाठी अनेकांनी घरीच राहणे पसंत केले आणि लाखों कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ आली. यातील अनेकांनी विविध कारणांसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते. परंतु नोकऱ्या गेल्याने हफ्ते फेडणे कठीण झाले. लॉकडाऊन संपताच बँकांनी हफ्त्यांसाठी तगादा लावणे सुरू केले व हफ्ते थकवणाऱ्यांना अतिशय निंदनीय प्रकारे मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. आता पुन्हा रुग्णसंख्या कमी होत असताना लॉकडाऊन उठताच या बँका नागरिकांना त्रास देऊ लागतील, या जाणीवेने मनसेचे अविनाश जाधव यांनी आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या हफ्त्यांसाठी तगादा न लावता, हफ्ते फेडण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी समज या बँकांना द्यावी, अशा मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले.
याआधी केली होती राज्यभर आंदोलन
मनसेने मागील लॉकडाऊन नंतर अनेक ठिकाणी तोडफोड करून आंदोलने केली होती. बँक हफ्ते न भरल्याने कारवाई होत होती. अशावेळी मनसेने अनेक वेळा हस्तक्षेप केला. आता पुन्हा हीच परिस्थिती उभी राहणार असल्याची शक्यता आहे.