ठाणे - अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत मनसेने दणदणीत विजयी मिळवून भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवला आहे. काकोळी ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. या ग्रामपंचायतीवर एकूण सात सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये 4 सदस्य मनसेचे निवडून आले आहे. तर अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापीवली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये नऊच्या नऊ जागा भाजपने जिंकल्या आहेत.
कल्याणच्या खोणी ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा
कल्याण तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीसाठी 4 प्रभागांत एकूण 24 उमेदवार रिंगणात उतरले होते तेथील अटीतटीच्या या निवडणुकीत तीन पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. कल्याण तालुक्यातील साऱ्यांचे लक्ष लागलेल्या कल्याण तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खोणीकडे पहिले जाते. आज (दि. 18) निकाल लागून खोणी ग्रामपंचायतीवर शिवसेनाचा भगवा फडकला असून 11 पैकी 5 शिवसेनेचे सदस्य निवडून आले तर सेनेचे पॅनल असलेले जय देवी महाविकास आघाडीचे एकूण 6 तसेच भाजप 2 मनसे 3 काँग्रेस 1 सदस्य विजयी ठरला. विशेष म्हणजे याच गावात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर विरोधकांमध्ये राडा झाला होता.
भिवंडी, मुरबाडमध्ये भाजप तर शहापूरमध्ये राष्ट्रवादी
भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी, सर्वाधिक भाजपचे उमेदवार विजयी ठरले असून शिवसेना व काँग्रेसमध्येही काही ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून रस्सीखेच झाल्याचे पाहवयास मिळत आहे. तर शहापूर तालुक्यात 5 ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने मुसंडी मारली तर काही ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडून आले आहे. मुरबाड तालुक्यात भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त