ठाणे - मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा आरोपी कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी टोळीचा सदस्य आहे. अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथील व्यापारी किशन गुजर यांना काही दिवसांपूर्वी सुरेश पुजारी टोळीतील संदेश शेट्टी याने संपर्क साधून 24 लाख रूपयांची खंडणी मागितली होती. अशी तक्रार गुजर यांनी अविनाश जाधव यांच्याकडे केली. तेव्हा जाधव यांनी या प्रकणात मध्यस्ती करुन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये पडल्यास ठार मारण्याच्या धमकीचा फोन पुजारी याने परदेशातून जाधव यांना केला होता.
ठाण्यातील अविनाश जाधव हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याने अनेक गरजू तसेच अडचणीत असलेले नागरिक जाधव यांच्याकडे तक्रारी घेऊन येत असतात.