ठाणे - अंबरनाथ शहरात राहणारे मनसेचे ठाणे जिल्हा संघटकाची बुलेट चोरीला गेल्याची घटना घडली असून या चोरीची प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. संदीप लकडे असे बुलेट चोरीला गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
संदीप लकडे यांनी आपली बुलेट मंगळवारी रात्रीच्या सुमाराला वर्धमान नगरच्या कार्यालयाबाहेर बुलेट पार्क केली होती. त्याच दिवशी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी अवघ्या काही सेकंदात आधी बुलेटचे हॅन्डल लॉक तोडले. त्यानंतर साडेसहा मिनिटे टेहाळणी करून मोठ्या शिताफीने चावी न लावता बुलेट सुरु करून पसार झाले.
आता शिवाजीनगर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. या चोरांना पकडने पोलिसांसमोरील मोठे आव्हान बनले आहे.