ठाणे - शहरातील एका बॅनरमुळे शिवसेना आणि मनसेत वादाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली आहे. 'साहेबांचे खरे वारसदार हिंदुहृदयसम्राट राज ठाकरे' अशा आशयाचे बॅनर ठाण्यात लागल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हे बॅनर लावले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
२३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या दिवशी मुंबईत आयोजित महाअधिवेशनात मनसेने फक्त झेंडाच नाही, तर आपला अजेंडाही बदलला. मराठीसोबतच हिंदूत्व हीच आपली भूमिका असेल, असे स्पष्ट संकेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाअधिवेशनात दिले होते. या पार्श्वभूमीवर ठाण्यात लागलेल्या या बॅनरमुळे भविष्यात शिवसेना आणि मनसे द्वंद रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - मनसेची 'शिवराजमुद्रा', राज ठाकरेंच्या हस्ते नव्या झेंड्याचे अनावरण
'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लोभापायी जे केले, त्यामुळे हिंदूंचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यांनी आता अयोध्येला जावे किंवा रामसेतू बांधावा, तरीही तमाम हिंदू जनता आता राज ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे साहेबांचे खरे वारसदार हे राज ठाकरे हेच आहेत,' अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'मनसेची विचारधारा वेगळी, सोबत घेतल्यास भाजपचे होईल नुकसान'
रंग बदलून सरकारमध्ये सामील झाल्याची टीका राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केल्यानंतर आता मनसेकडून दुसरा वार या बॅनरद्वारे करण्यात आला आहे. यामुळे शिवसेना विरुद्ध मनसे असा थेट सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनंतर हिंदूहृदयसम्राट ही उपाधी राज ठाकरे यांना देऊन मनसेने आगामी राजकारणाची दिशा ठरवून टाकल्याने महाविकासआघाडीच्या सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेची चांगलीच गोची होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा - 71वा प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्रातील 54 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर
यावर्षी नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिका आणि नगरपालिकांची निवडणूक आहे. यातील बहुतांश ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता मनसेकडून शिवसेनेला थेट आव्हान देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. ठाण्यातील या बॅनरसोबत सेल्फी काढायला तरुणाई गर्दी करत आहे.