ठाणे - उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील बहुंताश सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र या जटील समस्येकडे पालिका प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष होत आहे. याविरोधात आज (सोमवार) मनसेच्या वतीने उल्हासनगर महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा निषेध करीत मनसैनिकांनी टमरेल भेट देऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
उल्हासनगर प्रभाग समिती क्र१ च्या अंतर्गत असणाऱ्या पॅनल क्र २ मधील तेजुमल चक्की समोरील शौचालयांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. घरात शौचालय नसणाऱ्या परिसरातील रहिवाशांचे खुप हाल होत आहेत. त्यांना शासन आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे लाखो रुपयांचा निधी खर्च करून संपूर्ण शहराला स्वच्छता अभियानाचे महत्व सांगत फिरणाऱ्या उल्हासनगरच्या महापौर पंचम ओमी कलानी या याच पॅनलमधून निवडून आल्या आहेत. त्यांच्या प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची अवस्थाही खूप दयनीय झाली आहे. २८ जानेवारीला शौचालयांच्या दयनीय अवस्थेबाबत शहर मनसेच्या वतीने महापालिका प्रशासन व महापौर यांना पत्रव्यवहार केला होता. मात्र आठवडा उलटून गेला तरीही परिसरातील नागरिकांच्या समस्येवर तोडगा न काढल्याने महापालिका आयुक्त, आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते यांच्या दालनासमोरच परिसरातील नागरिकासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मनसे स्टाईलने प्रसाशनाचा शौचालयाचे 'टमरेल' देऊन निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी उपजिल्हा सचिव संजय घुगे, शहराध्यक्ष बंडू देशमुख, शहर संघटक मैनुद्दीन शेख, उप शहराध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश सेठपलानी, दिनेश आहुजा विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मनोज शेलार, विभाग अध्यक्ष कैलास वाघ, बादशहा शेख, उपविभाग अध्यक्ष काळू थोरात, अरुण कोळी, विद्यार्थी सेनेचे शहर सचिव सचिन चौधरी, यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, मनसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.