ठाणे : राममंदिर भूमीपूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला दिल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याच मुद्यावर टिका केल्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीचे आमदार तथा भाजप सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनीही यात उडी टाकली आहे. राम मंदिरावरील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अशी विधाने केली जात असल्याचा टोला मारून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.
उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केल्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत जाण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपचे नाव न घेता टीका केली. राऊत यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असल्याचे संकेत मिळत असतानाच डोंबिवलीचे आमदार तथा भाजप सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता टिका केली आहे.
आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजप आणि एनडीएच्या अजेंड्यावर रामंदिराचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आज तो पूर्णत्वाच्या दिशेने जातो हे लक्षात आल्यावर काही पक्षाचे नेते जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळी विधाने करत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील जनतेला शासनाच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यात असफल ठरल्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी राममंदिरच्या मुद्यावर विधाने करत सुटली आहेत. हा त्यांचा खोडसळ प्रयत्न असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला आहे.