ठाणे - तिवरे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटले असे बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. त्यांची राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाठराखण केली आहे. ही चूक तानाजी सावंत यांची नसून त्यांना ब्रीफ करणा-या अधिकाऱ्यांची आहे, असे विनोद तावडे म्हटले आहे. यामुळे तावडे यांनी सावंत यांना सोडून अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे.
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आज ठाण्यात भाजपातर्फे संघटना पर्व सदस्यता अभियान २०१९ चे आयोजन केले गेले होते. यावेळी मंत्री विनोद तावडे यांनी हे वक्तव्य केले. आजच्या ठाण्यातील संघटना पर्व सदस्यता अभियान २०१९ निमित्त मराठी कलाकार अशोक समेळ, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर, खगोल तज्ञ दा. कृ. सोमण, उद्योजक समीर नातू आणि रविंद्र प्रभू देसाई यांनी भाजपा सदस्य नोंदणी करुन भाजपात प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दोघे एकत्रित करीत असलेल्या दौऱयाबद्दल बोलताना मंत्री तावडे म्हणाले की, आदित्य ठाकरे म्हणजे नवीन पिढीसाठी चांगली गोष्ट आहेत. या दौऱ्याचे त्यांनी स्वागत केले. तसेच 'एक देश, एक झेंडा, एक पंतप्रधान' असे म्हणत यावेळी तावडे यांनी काश्मिर मुद्यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचले आहे.