ठाणे - मीरा रोड पोलिसांनी शांती नगर परिसरातून दोन अनोळखी व्यक्तींना अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास 25 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. शांती नगर परिसरातील एका जागृत नागरिकाने पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली आहे.
शांती नगर परिसरात आज सकाळी आठच्या सुमारास पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका नागरिकाने काही संशयित व्यक्तींबद्दल माहिती दिली. गस्तीवर असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी स्वप्नाली पालांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. यावेळी त्यांच्याकडील दोन मोठ्या पिशव्यांमध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात आरोपी प्रदीप दुबे, संतोष पांडे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. संबंधित कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कदम, उपनिरीक्षक स्वप्नाली पालांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे, पोलीस हवालदार काळूराम काळडोके यांनी केली.