मीरा-भाईंदर (ठाणे) - मीरा रस्त्यावरील सोन्याच्या दुकानात ७ जानेवारीला दुपारी २ च्या सुमारास बंदुकीचा धाक दाखवून चोरटे सोन्याचे दुकान लुटून पसार झाले होते. मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिकरित्या तपास करून शिताफीने तीन आरोपींना उत्तरप्रदेशमधील गाजीपूरमधून अटक केली आहे. उर्वरित दोन आरोपींचा तपास करत आहेत.
मीरा रस्त्याच्या शांतीनगर परिसरातील सेक्टर चारमधील मुख्य रस्त्यावर असलेल्या एस कुमार डायमंड अँड गोल्ड या सोन्याच्या दुकानात ७ जानेवारी दुपारी २ च्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती सोने घेण्याच्या बहाण्याने आत शिरले आणि त्यातील एका व्यक्तीने बंदूक बाहेर काढून दुकानात असलेल्या कर्मचऱ्यांना धमकावून दुकान लुटले. यातील दोन आरोपी आपली मोटारसायकल सुरू होत नाही म्हणून रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळून गेले. गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिकदृष्ट्या तपास करून तीन अट्टल गुन्हेगारांना उत्तरप्रदेशमधील गाजीपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
४० लाखांचे डायमंड, सोने तर ५ लाख २८ हजार जप्त
दिवसाढवळ्या दरोड्यामुळे एकच खळबळ माजली होती. मात्र, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी परिमंडळ-१ च्या गुन्हे शाखेला जबाबदारी दिली. गुन्हे शाखेची पथके उत्तर प्रदेश येथे रवाना झाली आणि आज सकाळी ७.३० च्या सुमारास उत्तरप्रदेश गाजीपूरमधून विनय कुमार सिंग उर्फ सिंतू सिंह (वय ४७), शैलेंद्र मुरारी मिश्रा (वय ४२) व दिनेश कलावू निषाद (वय २४) तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी कट्टे, जिवंत काडतुसे, मोबाईल फोन तसेच ४० लाखाचे दागिने व ५ लाख २८ हजार रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत.
अद्याप दोन आरोपी फरार
दरम्यान, याप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार असून त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर खून, अपहरण, खंडणी, दरोडा व विनापरवाना शस्त्र वापरणे आदी गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सदर प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी, पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सपोनि विलास कुटे, हवालदार अर्जुन जाधव संजय शिंदे ,अशोक पाटील, राजू तांबे, जनार्दन मते, पुष्पेन्द्र थापा, सचिन सावंत, मनोज चव्हाण, मनोज सपकाळ, शिवा पाटील, राजेश श्रीवास्तव, गोविंद केंद्रे यांच्या पथकाने सदर यशस्वी तपास करून आरोपींना अटक केली.