ठाणे - जीन्स कंपनीच्या नराधम मालकासह त्याच्या मित्राने १६ वर्षीय कामगार तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उल्हासनगर कॅम्प ५ परिसरात घडली. पीडितेने सुसाईड नोट लिहून गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने ही घटना उघडकीस आली.
या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी नराधम मालकासह त्याच्या मित्रावर बलात्कारासह पोक्सो अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. राजू दिर्दोडे (३५) असे नराधम कारखाना मालकाचे नाव असून तो फरार आहे. तर त्याचा मित्र प्रकाश साळवे या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प.नं. ५ परिसरात पीडिता अपंग आई-वडिलांसोबत राहते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने घर प्रपंच चालविण्यासाठी पीडित मुलगी आईसोबत जवळच्या जीन्स कारखान्यात जीन्स कटिंगचे काम करण्यासाठी जात होती. या जीन्स कारखान्याचा मालकाची वाईट नजर तिच्यावर पडली. यानंतर त्याने पीडितेसोबत प्रेमाचे नाटक करून तिची सहानुभूती मिळवली. तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर मालकाने गेल्या १ वर्षापासून पीडितेला उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी नेवून तिच्यावर वांरवारबलात्कार केला.
दिर्दोडे याचा मित्र प्रकाश साळवेने पीडित तरुणीला तुझा मित्र राजूने तूला बोलावले, आहे, अशी थाप मारून तिला आपल्या सोबत घेवून गेला. त्यानंतर त्याने तुझे आणि राजूचे प्रेमप्रकरण मला माहित आहे. मी तुझी बदनामी करणार, अशी धमकी देत त्यानेही तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप या पीडितेने केला आहे.
गेल्या काही दिवसापासून पीडित तरुणीने राजूकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिच्याशी जोरदार भांडण केले आणि लग्नास नकार दिला. राजू याने तिला मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. जा मर नाहीतर फाशी घे, असे बोलून तिला हाकलून लावले. यामुळे पीडित तरुणीला आपली आता बदनामी होणार या भीतीने तिने १८ मार्चला राहत्या घरात सुसाईड नोट लिहून गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील लोकांच्या ही बाब वेळीच लक्षात येताच तिच्या गळ्यातील फास काढला आणि तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामुळे तिचा जीव वाचला.
या घटनेनंतर हिललाईन पोलीस ठाण्यात ३७६,(३),३२३, ५०६, ३४, सह पोक्सो कलम ४, ६, ८, १२, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी साळवेला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर करून अधिक पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दिर्दोडे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.