ठाणे (शहापूर) : Minor Girl Gang Rape : धक्कादायक बाब म्हणजे, पाच आरोपींपैकी चारजण विधीसंघर्ष बालक असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून, पाचही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्याच ठाणे जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिला नसल्याचे या दोन्ही लागोपाठ घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनांमुळे जाणवत आहे.
पीडितेला उचलून नेले आणि केला बलात्कार : पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी कुटुंबासह शहापूर तालुक्यातील एका गावात राहते. तर त्याच गावातील पाच नराधमांची वाईट नजर पीडितेवर सप्टेंबर २०२३ पासून होती. त्याच महिन्यात गणपती बसण्यापूर्वी गावातील पाच नराधमांनी पीडित मुलीच्या घरात घुसून तिचे नाक, तोंड दाबून तिला उचलून घरानजीक असलेल्या गवतात बळजबरीने नेले. त्यानंतर पाचही नराधमांनी पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला.
बदनामीच्या भीतीपोटी गप्प : या घटनेमुळे पीडिता भयभीत झाल्याने बदनामीच्या भीतीने तिने घडलेला प्रकार कोणाला सांगितला नव्हता. त्यामुळे नराधमांची हिंमत वाढत गेली आणि त्यानंतर वारंवार पाचही नराधम तिच्यावर बलात्कार करीत होते. वारंवार होणाऱ्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे पीडित मुलीला त्रास असह्य झाला. दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी त्याच पाच जणांनी पीडितेला बळजबरीने गवतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पीडितेच्या आईची पोलिसात तक्रार : दरम्यान, या घटनेची पीडितेच्या घरच्यांना माहिती मिळताच, पीडितेला घेऊन तिच्या आईने १८ ऑक्टोबर रोजी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच, पोलिसांनी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून कलम ३७६, (२), (ए) ३७६ (डी) तसेच पोक्सोचे कलम ४, ६ प्रमाणे पाचही नराधमांवर गुन्हा दाखल करून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.
आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना : या संदर्भात शहापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांच्याशी संपर्क साधला असता, पाच जणांवर अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या पाच आरोपींपैकी चार अल्पवयीन आहेत. या पाचही जणांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना केली असून, लवकरच त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: