ठाणे - राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी रुता आव्हाड आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी यांनी ठाणे महानगरपालिकेच्या कोरोना काळातील भोंगळ कारभारा विरोधात ठाणे महानगरपालिकेतच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले आहे.
कोविड १९ ची परिस्थिती गंभीर असून महापालिका याबाबत अजिबात गंभीर नाही. ठाणे महानगरपालिकेकडे रुग्णांकरता बेड नाहीयेत. ॲाक्सिजन नाहीये. रेमडेसिवीर इंजेक्शन नाहीयेत. नेमकं ठाणे महानगरपालिकेचे सुरु आहे तरी काय? असा जाब रुता आव्हाड यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे. पालिकेचे अधिकारी रुता आव्हाड यांची समजूत काढण्यास आले होते. तेव्हा त्या अधिकाऱ्यांवर संतापल्या. या आंदोलनाला मनसेने देखील पाठिंबा देत ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव देखील मनसे कार्यकर्त्यांसोबत ठिय्या मांडून बसले. हे आंदोलन सुरु असताना ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि उपमहापौर पल्लवी कदम यांनी महापालिकेत प्रवेश केला. आणि हे आंदोलन कशासाठी सुरु आहे हे बघताच तिथून निघून गेले.