ठाणे - जिल्ह्याचे पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. काल(बुधवारी) शिंदेंनी आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. आपला चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे शिंदे यांनी ट्विटकरून सांगितले. त्यांची प्रकृती ठीक असून संपर्कात असलेल्यांनी देखील कोरोनाची चाचणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
गेली 5 महिने एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात अनेक उपाययोजना केल्या. मुंबई आणि ठाण्यातील कोविड रुग्णालयांमध्ये जाऊन त्यांनी अनेक सामान्य नागरिक व शिवसेना कार्यकर्त्यांची भेट शिंदे यांनी घेतली होती. तीन दिवसापूर्वीच त्यांनी कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली होती. त्याच दिवशी ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांची देखील त्यांनी रुग्णवाहिकेमध्ये भेट घेतली होती.
दरम्यान, एकनाथ शिंदेंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 'लवकर बरे व्हा, पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा' असे ट्विट करत ठिक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.