ठाणे - ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी ठाणे-मुलुंड दरम्यान २३-२४ जानेवारी आणि २४-२५ जानेवारीच्या मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप-डाउन धीम्या, जलद मार्गासह पाचवा-सहावा मार्ग असे सहा मार्ग मध्यरात्री १ ते पहाटे ४.३० या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहतील. ब्लॉक काळात कुर्ला ते ठाणे दरम्यान मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० पर्यंत लोकल फेऱ्या रद्द राहणार असून त्यासाठी कोपरी पुलावरील वाहतुकीचे देखील नियमन करण्यात आले आहे.
२३ तारखेला रात्री ९ ते सकाळी ६ आणि २४ तारखेला रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई-ठाणे महामार्गावरील कोपरी पुलावरील रस्ते वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे. काही लांबपल्ल्यांच्या गाड्या पुणे, दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकांत थांबवण्यात येणार आहेत. या पूर्वी पालिका आणि MMRDA च्या माध्यमातून १६ आणि १७ जानेवारी रोजी गर्डर टाकण्यासाठी कोपरी पूल बंद करण्यात आला होता.
आज आणि उद्या ६३ मिटर लांबीचा गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असून स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे जातीने हजर होते. MMRDA, रेल्वे, पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस यांनी या कामासाठी अथक परिश्रम घेतल्याचे पालकमंत्री म्हणाले. त्यांनी खासदार राजन विचारे यांचे देखील कौतुक केले. सदरचे काम पूर्ण झाल्यावर हा रस्ता 8 पदरी होणार असून त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदरचा रस्ता आठ लेनचा असणार आहे. तर दुसरीकडे पाहिले तर रेल्वेच्या वतीने हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हे काम सुरू आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु पुढील दोन दिवसांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर मेगाब्लॉक रद्द करण्यात येईल आणि पूर्ववत सेवा सुरू होईल, असे शिंदे यांनी बोलताना सांगितले.