ठाणे - पॅरोलवर असलेले एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्याविरोधात एका ३८ वर्षीय माहिलेने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खालिद गुड्डू यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खालिद गुड्डूच्या समर्थकांचा डीसीपीला घेराव -
ही कारवाई राजकीय हेतूने व आकसापोटी होत असल्याचा आरोप खालिद गुड्डू यांच्या परिवारासह एमआयएमचे शेकडो कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर एकत्र जमत खालिद गुड्डू यांच्यावरील खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची सखोल चौकशी करा, या मागणीसह शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्तांना घेराव घातला. तसेच खालिद गुड्डू यांच्या सुटकेच्या मागणीचे निवेदनही त्यांनी उपायुक्तांना दिले.
खंडणीच्या गुन्ह्यात झाली होती शिक्षा -
दरम्यान, इमारत बांधकाम व्यासायिकाकडून एक लाख रुपयांची खंडणी घेताना भिवंडी शहर एमआयएम पार्टीचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांना अटक करण्यात आली होती. ही कारवाई खंडणीविरोधी पथक आणि ठाणे गुन्हे शाखेने 24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री केली होती. यावेळी गुड्डू यांना समदनगर येथील बंगल्यावर व्यावसायिकाकडून एक लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी नऊ महिन्यांच्या शिक्षेसह 40 दिवसांच्या पॅरोलवर खालिद गुड्डू यांची सुटका झाली होती. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
हेही वाचा - आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ शकतो; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला