ठाणे - मुंब्रा येथील ठाणे महानगरपालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्यावतीने एक हजार बेड्सचे कोव्हिड हॅास्पिटल उभारण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी यासाठी जागेची पाहणी केली. यावेळी राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक रणजीत कुमार हेही उपस्थित होते.
कोरोनाच्या रुग्णांना बेडस् उपलब्ध व्हावेत यासाठी शहरामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एमएमआरडीएच्यावतीने 1000 बेड्सचे कोव्हिड 19 रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ते रुग्णालय कार्यान्वित होणार आहे. तथापि, भविष्यातील गरज लक्षात घेऊन मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत महानगरपालिकेच्या कौसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्यावतीने 1000 बेड्सचे कोव्हिड रुग्णालय उभे करण्यात येत आहे. यामध्ये ॲाक्सिजनची सुविधा असलेले 500 बेड्स तर, 100 बेड्सचे आयसीयू युनिट तयार करण्यात येणार आहे.
मुंब्रा परिसरात निर्माण होणाऱ्या कोव्हिड रुग्णालयामुळे या परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, या कोव्हिड रुग्णालयामुळे कळवा, मुंब्रा, कौसा आणि दिवा परिसरातील कोरोनाच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे, असे सांगितले.