नवी मुंबई - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या 4 कोटी 50 लाख रूपयांच्या मोफत कोरोनाच्या चाचण्या करणार आहेत. पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या प्रयत्नाने मेट्रोपोलीस लॅबच्या माध्यमातून या चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामुळे पालिकेच्या तिजोरीतील पैसे वाचणार असल्याचे आयुक्त देशमुख यांनी सांगितले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक वाढता कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मेट्रोपोलीस या कोरोना चाचणी करणाऱ्या आयसीएमआर मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळेसोबत नुकताच पत्रव्यवहार केला होता. त्यास या प्रयोगशाळेने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन पनवेल शहरामध्ये पुढील ३ महिन्यात एकूण १०,००० चाचण्या सीएसआर माध्यमातून मोफत करण्यासाठी तयारी दर्शवली आहे.
हेही वाचा - टोळधाडीचे आव्हान; कृषी मंत्रालय विदेशामधून मागविणार फवारणी यंत्र
यानुसार गुरुवारी संबंधित प्रयोगशाळेचे प्रतिनिधी डॉ. प्रदीप महिंद्रकर आणि महाजन यांच्यासोबत महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी विचारविनिमय करून नियोजनाची दिशा ठरविण्यात आली. कोरोनाच्या चाचणीसाठी ४,५०० रुपये खर्च येतो. मात्र, खाजगी लॅबच्या माध्यमातून मोफत कोरोना चाचणी या प्रस्तावामुळे महानगरपालिकेस अंदाजे रुपये ४ कोटी ५० लाख इतक्या रकमेचा फायदा होणार आहे. महानगरपालिकेच्या निधीतून हा खर्च केला असता तर तेवढा भार मनपाच्या तिजोरीवर पडणार होता. मात्र, आता तो खर्च वाचणार आहे, असे आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले. तर यासोबतच पनवेल महानगरपालिका क्षेत्र लवकरच कोरोना मुक्त करण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेस नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन देखील आयुक्तांनी केले आहे.