ठाणे - नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीवर कारवाई केल्याने संतापलेल्या तरुणाने कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण पोलीस कार्यालयात गोंधळ घातला. तेथील पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की तर केलीच, इतकेच नव्हे तर पोलीस कार्यालय पेट्रोल टाकून पेटवून देण्याची धमकीही दिली. या तरुणाला पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. सोनूसिंग भदोरीया असे या तरुणाचे नाव आहे.
सोनूसिंग बदोरिया हा कल्याण पूर्व, म्हसोबा चौक (न्यू जिम्मी बाग) परिसरात असलेल्या सिंग चाळीत राहतो. त्याची दुचाकी या परिसरात नो पार्किंगमध्ये उभी होती. तेथील वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी सदर स्कुटी चक्कीनाका येथील कोळसेवाडी वाहतूक उपविभाग कार्यालय येथे आणली.
सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोनू हा वाहतूक पोलीस कार्यलयात आला. त्याने कार्यालयात असलेल्या पोलीस हवालदार अंकुश अंबरीत, बोरसे, मकर यांना माझी गाडी सोडणार का नाही, असा दम भरला. माझा भाऊ सीबीआयमध्ये आहे, तुमची नोकरी घालवेल, अशी धमकीही त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर हवालदार बोरसे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली. इतकेच नव्हे तर तुमचे कार्यालय पेट्रोल टाकून पेटवून देईन, अशी धमकी देत कार्यालयात गोंधळ घातला. पोलिसांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सोनूसिंग भदोरीया याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.