ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सध्या रेरा फसवणूक प्रकरणी १० बांधकाम विकसकांना अटक केल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. विशेष म्हणजे रेरा सह महापालिकेचे बनावट कागदपत्रे तयार करून इमारती उभारणाऱ्या ६५ बांधकाम विकासकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी एसआयटी कडून सुरू आहे. याबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीने ( MCHI ) पत्रकार परिषद घेत या प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या बांधकाम विकासकांचा संबंध नसून ते एमसीएचे सदस्य नसल्याचे एमसीएचआयचे अध्यक्ष भरत छेडा यांनी स्पष्ट केले.
६५ बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल - बनवाट कागदपत्राच्या आधारे केडीएमसीची बनावट परवानगी तयार करून त्या बनावट परवानगीच्या आधारे महारेराचे बांधकाम प्रमाण पत्र मिळविण्याचे भासवण्यात आले. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केडीएमसीने तब्बल ६५ बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल केले. दुसरीकडे या प्रकरणी तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली. एसआयटीने आजमितीला बनावट कागदपत्र तयार करणारे पाच जणांसह पाच बिल्डरला अटक केली असून त्यांची सध्या कोठडीत चौकशी सुरु आहे. तर गुन्हे दाखल असलेल्या ४० हुन अधिक बिल्डर्सचे बँक खाती गोठावण्यात आली आहेत.
केडीएमसीची इमारतींवर कारवाई - एकीकडे प्रकरण उघडकीस आल्याने केडीएमसीने संबंधित इमारतींवर तोडक कारवाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे आता एमसीएचआयने ( MCHI ) देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. या वेळी एमसीएचआयच्या पदाधिकाऱ्यांनी हे ६५ प्रकरण आहेत. जी उघड झाली आहेत, अशी राज्यात हजारो प्रकरण असतील या प्रकारणामुळे शहराची बदनामी झाली आहे त्याचा परिणाम आता अधिकृत बांधकाम व्यावसायिकांवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंची भेट घेणार - शासनाची व नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्या या प्रकरणामुळे आम्हाला रेरा बांधकाम प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता महिनाभराचा कालावधी लागत आहे. त्यामुळे शासनाने पुढे असे प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कारणीभूत केली पाहिजे, अशी मागणी देखील एमसीएच्या वतीने करण्यात आली. शिवाय या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.