ठाणे - राज्यामध्ये अद्याप महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले नसले तरी या आघाडीचे सुत्र वापरण्यास राज्यातील महापालिकांमध्ये सुरुवात झाली आहे. ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के विराजमान झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पालिकेच्या मुख्यालयात जाऊन त्यांचे अभिनंदन केले.
हेही वाचा - नाशिकमध्ये शिवसेनेचा शो 'फ्लॉप'; भाजपचे सतीश कुलकर्णींची महापौर
महापौर नरेश म्हस्के आणि उपमहापौर पल्लवी कदम यांचे स्वागतावेळी जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. यावेळी दालनात झालेल्या बैठकीमध्ये आव्हाड आणि ठाकरे यांच्यातील चर्चा अजून समजू शकलेली नाही.
शिवसेनेचा कार्यकर्ता ते महापौर प्रवास -
शाखेचा फलक लिहण्यापासून राजकारणाला सुरुवात केली तेव्हापासून सेनेचा जिल्हाप्रमुख आणि आज ठाण्याचा महापौर हा प्रवास माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे. शहराच्या विकासावर भर देताना नगरसेवकांच्या अधिकारावर कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही. याची काळजी घेतली जाईल. असे नरेश म्हस्के यांनी सांगितले. तसेच 25 लाख लोकसंख्या असलेल्या या विकसित शहरात आणखी काही सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगून भविष्यात कोणताही वाद न करता, प्रशासनासोबत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - दोन दिवसात अंतिम निर्णय समजेल, उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय