ठाणे - उल्हासनगर शहरातील कॅम्प नं-५ परिसरातील खडी मशीन येथे डंपिंग ग्राउंडला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. डंपिंग ग्राउंडला भीषण आग लागून परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले असून घटनस्थळी अग्निशमनच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दलाचे जवान शर्थींचे प्रयत्न करीत आहेत. मात्र या आगीच्या धुरामुळे परिसरात नागरिकांना डोळे चुरचुरणे, तसेच घश्याचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - युती सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती जाहीर
यापूर्वी डंपिंग हटविण्यासाठी अनेक मोर्चे आंदोलन
स्थानिक नागरिकांनी व नगरसेवकांनी अनेकदा डंपिंग हटावसाठी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. तसेच महासभेत यापूर्वी नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करुन डंपिंग ग्राउंड हटावची मागणी केली. डंपिंगच्या आगीमुळे २० हजार पेक्षा अधिक परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. मात्र, पालिका प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा डंपिंग ग्राउंडला अचानक भीषण आग लागल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
हेही वाचा - मुंबईत पुन्हा धावणार १२ इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया, या ठिकाणी असेल थांबा