ठाणे- जिल्ह्यासह कल्याण शहर व ग्रामीण परिसराला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. पावसाबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे देखील उन्मळून पडली. पावसामुळे गावकऱ्यांची दैनीय अवस्था होऊन अनेक लहान मोठ्या घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
कल्याण ग्रामीण आणि विशेषतः नेवाळी परिसरात परतीच्या पावसाने सायंकाळी अक्षरशः हैदोस घातला होता. पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बहुतांश झाडे उन्मळून पडली. यापैकी काही झाडे घरांवर कोसळल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा- डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटाजवळच उलटला ट्रक; प्रवाशांमध्ये खळबळ
कल्याण तालुक्यातील नेवाळी, नेवाळी पाडा आणि काकडवाल, डावलपाडा भागात अनेक घरे आणि स्मशानाचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या नुकसानग्रस्त ग्रामस्थांना सध्या शासकीय मदतीची अपेक्षा आहे. मात्र महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने अद्याप त्यांची कुणीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर नुकसानाचे पंचनामे व्हावेत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
हेही वाचा- युतीच्या वाटाघाटीत भाजपचा घाटा झाल्याने माझी बंडखोरी - नरेंद्र पवार