ठाणे- ठाणेकरांना आनंदनगर मुलुंड टोल नाक्याच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी मनसेकडून सातत्याने आंदोलने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने मंगळवारी आनंदनगर ठाण्याच्या प्रवेशव्दारावर धरणे आंदोलन केले. यावेळी मनसेने सर्व एम.एच ०४ क्रमांकाच्या गाड्यांना टोल न भरण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर, मनसेच्या पदाधिकारी व नेत्यांकडून 'टोलचा झोल बंद करा' अशा घोषणा देण्यात आल्या.
विधानसभा निवडणुकीपूर्वी टोलच्या विरोधात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. आनंदनगर टोलनाक्यावरच एम.एच. ०४ या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये यासाठी मानवी साखळी करून मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या आंदोलनाच्या आठ दिवसापूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एम.एच. ०४ नंबर असणाऱ्या वाहनांकडून टोल घेण्यात येणार नासल्याचे जाहीर केले होते.
मात्र, त्यानंतरही ठाणेकरांकडून टोल घेणे सुरूच असल्याने आमदार जनतेशी खोटे बोलत आहेत, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला होता. यावेळी धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने आनंदनगर टोल नाका ते कोपरी पुलापर्यंत मानवी साखळी तयार केली होती. भविष्यात टोल नाक्यापासून ते थेट माजिवडा पर्यंत मानवी साखळी करण्यात येईल, असे सांगत यापुढे ठाणेकरांना टोल मुक्त करण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा जाधव यांनी त्यावेळी दिला होता. मात्र, तरीही या मार्गावर टोल घेणे सुरूच असल्याने सोमवारी सकाळी पुन्हा एकदा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मात्र मानवी साखळी न करता धरणे आंदोलन करण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसेचे नेते अभिजीत पानसे, शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी एम.एच ०४ वाहनांना टोल मुक्त करा, अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
आनंदनगर टोल झाला त्रासदायक
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेल्या आनंदनगर टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागत असल्याने या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात दररोज वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आनंदनगर टोल नाका पार करायला जिथे १० मिनिटांचा वेळ अपेक्षित आहे, त्या ठिकाणी पाऊणतासाचा वेळ लागत आहे. ठाणेकरांना गेल्या अनेक वर्षापासून या टोल नाक्याचा त्रास होत आहे. केवळ ठाण्यातून मुलुंडच्या हद्दीमध्ये जाण्यासाठी टोल द्यावा लागत असल्याने हा अन्याय असल्याची भावना ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा-भरधाव डंपरखाली चिरडून पती-पत्नीसह मुलगी जागीच ठार; मुलगा गंभीर