ठाणे - वडिलांकडे विवाहित मुलीसोबत लग्न करण्याची तरुणाने मागणी घातल्याने दोघांध्ये वाद झाला. याच वादातून मुलीच्या वडिलांनी धारधार ब्लेडने त्या तरुणाचे पोट चिरल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना भिवंडीतील न्यू आजादनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या हल्लेखोर वडिलांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक केली आहे. मोहम्मद इस्तीयाक उर्फ शेंडी मोहम्मद उमर अन्सारी (वय 40 वर्षे, रा. न्यू आजादनगर, भिवंडी ), असे अटक आरोपीचे नाव आहे तर अय्याज रियाज शेख ( वय 38 वर्षे), असे जखमीचे नाव आहे.
छातीच्या मध्यभागापासून ते पोटापर्यंत ब्लेडने वार - आरोपी मोहम्मद इस्तीयाक उर्फ शेंडी व जखमी अय्याज हे दोघेही भिवंडीतील न्यू आजादनगर परिसरात राहतात. त्यामुळे दोघांची ओळख आहे. त्यातच अय्याज हा रविवारी (दि. 29 मे) दुपारच्या सुमाराला त्याच्या घराबाहेर उभा असताना त्याने आरोपी मोहम्मद इस्तीयाक उर्फ शेंडी यांच्या विवाहित मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून त्यांच्याकडे विवाहित मुलीच्या लग्नाची मागणी केली. यामुळे दोघांमध्ये वाद झाला आरोपीने अय्याजला सांगितले की, माझी मुलगी विवाहित आहे. तरी तू विवाह करतो, तिचा पती अजूनही जिवंत आहे. मग तू कसा लग्न करतोस, असे बोलून आरोपीने हातातील धारदार ब्लेडने अय्याजच्या छातीच्या माध्यभागापासून ते पोटापर्यंत वार केला. या हल्ल्यात अय्याज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आरोपीला एक जूनपर्यंत पोलीस कोठडी - याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात ( Shanti Nagar Police Station ) गुन्हा दाखल होताच रविवारी (दि. 29 मे) रात्रीच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सोमवारी (दि. 30 मे) आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्हाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साहेबराव गायकवाड करत आहेत.
हेही वाचा - Thane Murder Case : भांडण सोडविणे बेतलं जीवावर; ठाण्यात दोघांच्या भांडणात तिसऱ्याची हत्या