ठाणे : उसनवारीचे पैसे परत देत नसल्यामुळे एका व्यक्तीने मामेबहिणीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली. उसने पैसे परत देत नसल्याचा राग मनात धरुन आरोपीने महिलेच्या डोक्यावर हातोडीने हल्ला केला आणि तिच्या मानेत इंजेक्शन टोचले. याप्रकरणी आरोपीविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव भुयान, असे हल्लेखोराचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ममताराणी सुभाष पात्रा, असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ममताराणी ह्या पती सुभाषसह डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी भागात राहतात. येथील साईश इनक्लेव्ह इमारतीत त्यांचे घर आहे. ममताराणीचे पती सुभाष हे कल्याण डोंबिवली महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. तर ममताराणी आणि आरोपी राजीव हे दोघेही ओडिसा राज्याचे मूळ रहिवासी आहेत. सध्या ते दोघे डोंबिवलीत राहतात. राजीव डोंबिवलीतील एका खासगी कंपनीत कामाला आहे. राजीव आधी ममताराणी यांच्यासोबत राहत होता. काही महिन्यापूर्वी सुभाष यांनी राजीवकडून उसने पैसे घेतले होते. त्याच पैशाच्या वादातून राजीवने मामेबहिण ममता राणीवर जीवघेणा हल्ला केला.
राजीवला घराबाहेर काढले : सुभाष यांना पैसे देऊन खूप दिवस झाल्याने राजीव त्यांच्याकडे पैसे मागत होता. राजीव पैशांसाठी तगादा लावत असल्याने सुभाष आणि राजीव यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर सुभाष यांनी राजीवला घराबाहेर काढले. तेव्हापासून राजीव हा अंबिकानगरमध्ये राहत होता.
बहिणीवर केला हल्ला : 8 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राजीव सुभाषच्या घरी गेला. त्यावेळी त्याने दारू घेतली होती. घरात फक्त ममताराणी होती. राजीव तिच्याकडे पैसे मागू लागला. पैशांसाठी त्याने तगादा लावल्यानंतर तिने सांगितले की, माझे पती घरी नाहीत. ते आल्यानंतर तुझे उसने पैसे देऊ. परंतु राजीव हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने बहिणीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, यामुळे त्यांचे भांडण सुरू झाले. या भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले. मारामारीत आरोपी राजीवने त्याच्या बॅगेतून हातोडी काढून ममताराणीच्या डोक्यात मारली. तिला भीती दाखविण्यासाठी तिच्या मानेत इंजेक्शनही टोचली. त्यानंतर राजीव तेथून पळून गेला.
गुन्हा दाखल : ममताराणी जखमी झाल्याचे शेजाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. उपचार करुन घरी आल्यानंतर 9 ऑगस्ट रोजी राजीवविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.
हेही वाचा-