ठाणे - पान खाण्यासाठी टपरीवर गेलेल्या व्यक्तीस अचानक पानटपरीत वीज उतरून शॉक लागल्याने तडफडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पानटपरीवर पान खाणे तरुणाच्या जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील लजीज धाब्यावजवळील पानटपरीवर घडली आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पानटपरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्देश मनोहर तांबे ( वय 34 वर्षे, रा. ठाणे), असे मृत तरुणाचे नाव आहे.
पानटपरी चालकाने केली अवैधपणे वीज जोडणी...
मुंबई-नाशिक महामार्गावरील ओवाळी ग्रामपंचायत हद्दीतील लजीज धाब्यालगतच लजीज पानशॉप नावाची पानटपरी आहे. मृत उद्देश हा बुधवारी (दि. 24) सकाळच्या सुमारास लजीज पानशॉप येथे पान खाण्यासाठी गेला होता. त्यावेळी पानटपरीत अचानक विजेचा करंट उतरून त्याला शॉक लागल्याने गंभीर होरपळा होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर पोलीस तपासात पानटपरी चालकाने अवैधपणे वीज जोडणी केल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
पानटपरी चालक फरार...
या घटनेनंतर पानटपरी चालक फरार झाला असून मृत उद्देशचा भाऊ सुशिल तांबे याने पानटपरी चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय शिरसाठ करत आहेत.
हे ही वाचा - अजब चोरी.. गोदाम फोडून चोरटयांनी चॉकलेटसह मिठाईचे बॉक्स केले लंपास