ठाणे : मद्यधुंद अवस्थेत मोबाईलवर बोलत असताना तरुणाचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. एका इमारतीत चार ते पाच मित्र दारूची पार्टी करत होते. त्यावेळी एकाला जेवण करत असताना मोबाईलवर कॉल आला. त्यावेळी तो बोलण्यासाठी इमारतीच्या खिडकीजवळ गेला असता, त्याचा तोल गेला. त्यामुळे तरुणाचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना खारबाव गावच्या हद्दीत घडली आहे.
मृत्यूची नोंद : ही घटना भिवंडी तालुक्यातील खरबाव गावच्या हद्दीत घडली. अंगत अशोक ठाकूर (वय ३१, रा. खरबाव) असे मृत मद्यपी तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
तिसऱ्या मजल्यावरून कोसळला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अंगत हा मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असून, तो भिवंडी तालुक्यातील खारबाव गावात राहत होता. तो टाटा प्रोजेक्टमध्ये कामगार म्हणून कार्यरत होता. त्यातच खारबाव येथील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नीता शॉपिंग सेंटर या इमारतीत रविवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास मृत अंगत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ४ ते ५ मित्रांसह मद्यपान करत होता. त्यावेळी अंगतला मोबाईलवर कॉल आल्याने तो मोबाईलवर बोलण्यासाठी खिडकीजवळ आला असता त्याचा तोल गेल्याने तो इमारतीच्या खिडकीतून खाली कोसळला.
पोलीस तपास सुरू : तरुण इमारतीवरून पडल्याचे पाहून पार्टीत सहभागी झालेल्या त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने भिवंडी शहरातील दिवंगत इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास भिवडी तालुका पोलीस करीत आहेत.