नवी मुंबई - येथील घनसोली गावात हनुमान मंदिराच्या बाजूला एका व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात? असे अनेक कयास लावले जात असून, परिसरात उलट सुलट चर्चाना उधाण आलं आहे. शिवाय अशी घटना गावात प्रथमच घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - सीसीटीव्ही - चोरट्यांचा हॉटेलच्या गल्ल्यावर डल्ला, आईस्क्रीम खात दुकानही केले साफ
आज(मंगळवार) सकाळी नवी मुंबईतील घनसोली गावात एक व्यक्ती हनुमान मंदिराशेजारी पडलेला आढळला. रहिवाशांनी जवळ जाऊन पाहिले असता, संबंधित व्यक्ती मृतावस्थेत होता. त्यामुळे नागरिकांनी ताबडतोब रबाळे पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, हा मृतदेह गावात भाड्याने राहणाऱ्या पण मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असणाऱ्या अखिलेश पटेल (३२) याचा असल्याची माहिती रबाळे पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
अखिलेश याचा मृत्यू कसा झाला? हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात? याचा अधिक तपास रबाळे पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे. तसेच अखिलेश पटेल याचा मृतदेह वाशी नवी मुंबई येथील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच पुढील तपासाला वेग येईल, असे रबाळे पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली.