ठाणे - जीन्स आणि टी-शर्ट घातले म्हणून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. पतीने केलेल्या मारहाणीत सुजाता जाधव गंभीर झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुधीर सीताराम जाधव (वय 33) याला अटक केली आहे.
कोपर रोड परिसरातील नवसमर्थ चाळीत सुधीर आणि पत्नी सुजाता राहतात. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुजाता यांनी परिधान केलेले टी-शर्ट व जीन्स पॅन्ट पाहून सुधीर संतापला. त्याने घरातील कामावरून तसेच जीन्स व पॅन्ट टी-शर्ट घालण्यावरून सुजाता यांच्यासोबत वाद घातला. संतापलेल्या सुधीरने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत सुजाता यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने शास्त्रीनगर रुग्णालायात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालायात हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - दोन अल्पवयीन दुचाकी चोरांना अटक, 5 दुचाकी जप्त
सुजाता अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. सुजाता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली पोलिसांनी सुधीर जाधव विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.