ठाणे - भिवंडी तालुक्यातील दाभाड येथील विटभट्टीवर अनेक मजूर काम करतात. दरम्यान, यापैकी एका मजूराच्या अतितीव्र कुपोषीत मुलीला श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यानंतर वैद्यकीय अधिक्षकांसह डॉक्टरांच्या पथकाने या मुलीची तपासणी केली. तसेच १४ दिवसांच्या उपचारानंतर मुलीची प्रकृती स्थिर होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. भूमिका विलास शनवार (वय, ३ वर्ष) असे कुपोषित बालिकेचे नाव आहे.
हेही वाचा - कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यास छावलातील ४०६ जणांना मिळणार डिस्चार्ज
मूळ पालघर जिल्ह्यातील शिसने ता.डहाणू येथील विलास शनवार मागील एका महिन्यांपासून भिवंडी तालुक्यातील दाभाड येथील नानु कुंभार यांच्या वीट भट्टीवर मजूरी करतात. यासाठी ते पत्नी सुरेखा, मुलगी भूमिका व एक वर्षाची तनुजा यांसह झोपडी बांधून राहत आहेत. दरम्यान, श्रमजीवी संघटनेच्या गावपातळीवरील मोर्चा संदर्भात बैठका सुरू असून त्यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते ग्रामीण भागात फिरत आहेत. यादरम्यान आशा भोईर या पदाधिकारी महिलेस दाभाड येथे सुरेखा ही महिला आढळून आली. तिच्याकडे मुलीची चौकशी केली असता ती आजारी असल्याचे माहिती आशा भोईर यांनी मिळाली. यानंतर भोईर यांनी दाभाड प्राथमीक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी मुलीचे वजन अवघे सहा किलो भरले, यामुळे मुलगी अती तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आल्याने तिला उपचारासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - 'राज्यात घडणाऱ्या घटनांचा तपास महाराष्ट्र पोलिसांनीच करायला हवा'
स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांच्या मार्गदर्शना खाली बालरोगतज्ञ, आणि आहारतज्ञांच्या पथकाने मुलीची तपासणी केली. यानंतर चौदा दिवस मुलीवर उपचार केल्यावर प्रकृतीत सुधारणा नक्की होईल, असे डॉ. अनिल थोरात यांनी सांगितले आहे. दरम्यान, ग्रामीण भागात कुपोषीत बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन पातळीवर अनेक योजना राबवून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही समाजातील कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसेल, तर शासकीय योजनांची विदारकता स्पष्ट होत आहे.