ठाणे - भिवंडी-वाडा रोडवरील गणेशपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी-रेवदी रोडवर असलेल्या मोकळ्या जागेतील केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज(बुधवारी) पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीमुळे गोदामातील केमिकलचे ड्रमचे तब्बल 70 ते 80 फूट उंच उडून भयंकर स्फोट होत होते. तर या आगीत लाखो रुपयांचे घातक केमिकल जळून खाक झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाची २ गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशामाक दलाच्या जवानांनी सकाळपर्यत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या ग्रामीण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात केमिकल भंगाराचा साठा असल्याने परिसरातील गावात मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर असे अनधिकृत केमिकलचा साठा ठेवतात कसे? असा प्रश्न निर्माण झाला असून गणेशपुरी पोलीस करताहेत काय? असा सवालही गावकरी विचारत आहे.
वर्षभरात ७८ केमिकल गोदामांना आगी ..
भिवंडी ग्रामीण परिसरात असलेल्या शेकडो गोदामांमध्ये बेकायदेशीरपणे रासायनिक द्रव्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात आहे. या बेकायदेशीर केमिकल साठ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शाासनाने दोन महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र भिवंडी तहसील विभागाने या आदेशाकडे जाणीव पुर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे या अनधिकृत गोदामांना वारंवार आगी लागण्याच्या घटना दररोज घडत आहेत. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. भिवंडीच्या गोदाम पट्ट्यात रासायनिक द्रव्याचा साठा व अन्य साधन सामुग्रीच्या सुमारे ७८ गोदामांना वर्षभरात आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
भिवंडीत भोपाळकांड होण्याच्या मार्गावर -
भिवंडी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे ४ लाख ३५ हजार गोदामे असून यातील वळ, माणकोली, राहणाळ, गुंदवली, काल्हेर, दापोडा, सरवली, कोपर, पुर्णा, कोनगांव, वडपे, सोनाळे या ठिकाणी केमिकलचे सुमारे ३४३ गोदामे आहेत. या गोदामांमध्ये अत्यंत ज्वलनशील असे अतिधोकादायक रासायनिक केमिकलचा साठा केला जात आहे. या केमिकल साठ्यांना वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. नुकतेच राहणाळ येथे झोपड्यांना लागलेल्या आगीत एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, व तीन जण जखमी झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा बेकायदेशीर केमिकल गोडाऊनचा प्रश्न ऐरणीवर आला असून भिवंडीचे भोपाळकांड होण्याच्या मार्गावर असल्याचे एकंदरीत दिसून आले आहे.