ठाणे - महावितरणच्या अभियंत्याने कोनगाव परिसरातील झाडे मुळासकट तोडून पर्यावरणाला हानी पोहोचवली आहे. त्यामुळे त्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
ड्रीम कॉप्लेक्स सोसायटीच्या रस्त्यावरील ४ ते ५ हिरवीगार झाडे गेल्या १२ एप्रिलला दुपारच्या सुमाराला कोन येथील महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अभिषेक यांनी काही मजूर लावून झाडे मुळासकट तोडली होती. वास्तविक महावितरण कंपनीकडून विद्युत तारांना अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या केवळ फांद्या वन विभागाची परवानगी घेवून तोडणे अपेक्षित आहे. मात्र, टाटा पॉवरच्या हायटेन्शन विद्युत तारांना अडथळा ठरत नसलेल्या ४ ते ५ हिरवीगार झाडे मुळासकट तोडली आहे. विशेष म्हणजे झाडे तोडताना वन अधिकाऱ्याची परवानगी न घेता आपला मनमानी कारभार करत पर्यावरणाला हानी पोहोचवली असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
तोडलेले एक झाड १० वर्ष, तर काही झाडे ५ ते ८ वर्ष जुनी झाडे होती. त्यामुळे सोसायटी राहणारे पदाधिकाऱ्यांनी १३ एप्रिलला कोनगाव पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अभिषेक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, दीड महिना उलटूनही त्या तक्रारीवर कोनगाव पोलिसांनी फौजदारी कारवाई न करता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्या पदाधिकाऱ्यांनी केला. याबाबत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शेले यांच्याशी संपर्क साधला असता कनिष्ठ अभियंता यांचा जबाब नोंद करण्यात आला आहे. तसेच त्यांनी झाडे तोडण्याबाबत शासनाचे परिपत्रक दिले आहे, असे सांगत वेळ मारून नेल्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, प्रत्यक्षात शासनाच्या परिपत्रकामध्ये झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी दिली होती. झांडाची बेकायदेशीर कत्तल करून पर्यावरणाला हानी पोहोचवत आहेत. त्यांना पाठीशी घालणारे पोलीस प्रशासन कारवाई करण्यात चालढकल करीत असतील तर पर्यावरण बचावाचा कायदा कागदोपत्रीच आहे का? असा गंभीर प्रश्नही त्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.