ठाणे - मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यातही पाणी भरले असून मंदिरातील शंकराची मूर्तीही पाण्याखाली गेली होती. या पांडवकालीन शिवमंदिराला विशेष महत्व असल्याने दर्शनासाठी येथे भक्तांची दिवसभर गर्दी असते. त्यांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून गाभाऱ्यातील मूर्तीच बाहेर आणावी लागली.
मंदिराच्या परिसरातही पाणीच पाणी साचल्याने भाविकांची रांगही कमी झाली आहे. ऐन श्रावणातच दर्शन घेता येत नसल्याने शिवभक्तांचा उत्साह मावळला आहे. युनेस्कोद्वारा विशेष दर्जा मिळालेल्या या मंदिराला आत्यंतिक महत्व आहे. भारतातीलच नव्हे तर भारताबाहेरील शिवभक्तही येथे येत असतात. मंदिर परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शिवभक्तांना आता गाभाऱ्यात जावून दर्शन घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.