ठाणे - आपापल्या राज्यात जाण्यासाठी मजूर आणि अन्य नागरिकांना सवलत दिल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बहुतांशी सर्वच प्रभाग कार्यालयांच्या आवारांमध्ये परवानगी मिळविण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. कल्याण असो की डोंबिवली सर्वच ठिकाणी हेच चित्र असून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे. सरकारतर्फे राज्याच्या बाहेर आणि राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी संबंधित नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर ही गर्दी झाली होती.
केडीएमसीने आपापल्या प्रभागक्षेत्र कार्यालयातहे प्रमाणपत्रे देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी नागरिक पहाटे 5 वाजल्यापासूनच प्रभाग क्षेत्र कार्यलयात मोठी गर्दी करत आहेत. ही गर्दी आटोक्यात आणताना प्रशासनाची प्रचंड दमछाक होत असल्याने पोलीस कुमक मागवावी लागली आहे. काही ठिकाणी तर एकमेकांना चिकटून रांगेत लोक रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. तर पुढे जाण्यासाठी जोतो धक्काबुक्की करताना दिसत आहे.
काही ठिकाणी लांबचलांब रांगा लागलेल्या दिसून येतात. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गर्दी झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची आणि फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तर याच दरम्यान, प्रभाग क्षेत्र कार्यालयातही लोकांची प्रमाणपत्रासाठी मोठी गर्दी होत असून, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी केले आहे.