ठाणे - रस्त्याच्या कडेला धूळखात पडलेल्या गाड्यांपासून ठाणेकर त्रस्त आहेत. त्यामुळे आता श्रीनगर भागात अनेक महिन्यांपासून धूळखात पडलेल्या गाडीवर स्थानिकांनी सुविचार रेखाटले आहेत. 'सरकार बदलेले पण गाडीची जागा बदलली नाही, मी पुन्हा येईन बोलून, परत ड्रायव्हर आलाच नाही', असे लिहिल्याने धूळखात पडलेल्या गाड्या निश्चितच हटवल्या जातील, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला. तसेच नाराजी देखील व्यक्त केली. या गाड्यांमुळे या परिसरातील सौंदर्य देखील हिरावून घेतले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
शहरातील गल्लीबोळात वर्षानुवर्षे एकाच जागी पडून राहिलेल्या भंगार गाड्यांना कोणीही वाली नाही. त्या धूळखात पडल्या आहेत. मात्र, या भंगार गाड्या हटवण्यासाठी उपाययोजना नाही का? असा सवाल ठाणेकर नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एकीकडे फेरीवाल्यांना हटवून पदपथ मोकळे करणाऱ्या पालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेने या भंगार गाड्यांचाही निकाल लावावा, अशी मागणी होत आहे. तसेच हास्यास्पद विनोद रेखाटून स्थानिक नागरिक वाहन धारक कधी येणार याची वाट पाहत आहेत.