ठाणे- लॉकडाऊन असेपर्यंत स्थलांतर करणाऱ्या मजुरांना रोखून त्यांच्या खाण्यापिण्याची व राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला दिले आहे. मात्र, स्थानिक प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाचा वाढता धोका पाहता शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे, हातावर पोट भरणाऱ्या मजुरांची उपासमार सुरू झाली आहे. यामुळे, जिल्ह्यातील हजरो मजूर कुटुंबांसह पायपीट करत घरी निघाले आहे. भुसावळला जाण्यासाठी पनवेलहून सुमारे २५ कुटुंब आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना डोक्यावर घेऊन रखरखत्या उन्हात गेल्या २ दिवसांपासून पायपीट करत निघाले आहे. विशेष म्हणजे, संचारबंदीत पनवेल ते भिवंडी तालुक्यातील कोनगाव हद्दीत येईपर्यत १०० च्यावर पोलीस व स्थानिक प्रशासनाचे ठिकठिकाणी चेक पोस्ट आहेत. मात्र, त्यापैकी एकही चेक पोस्टवर या मजुरांना विचारणा झाली नसल्याचे रवींद्र चव्हाण नावाच्या मजुराने सांगितले.
'शहरात कुठलीही मदत मिळाली नाही'
तर, दुसरीकडे स्थलांतरित होणाऱ्या मजूरवर्गापर्यंत कोरोनाविषयी राज्य सरकार करत असलेल्या घोषणा पोहोचत नसल्याचेही समोर आले आहे. भुसावळ व रावेर तालुक्यातील २५ मजूर कुटुंबे पोटाची खळगी भरण्यासाठी पनवेल शहरातील नाक्यावर उभे राहून हाताला मिळाले ते काम करणे आणि कुठेतरी रात्रीचा निवारा शोधाणे, असा त्यांचा दिनक्रम होता. मात्र,कोरोनामुळे कुठलेच काम नसल्याने या कुटुंबीयांनी घरची वाट धरली आहे. रवींद्र चव्हाण नावाच्या मजुराने सांगितले की, इथे राहण्यापेक्षा गावाकडे किमान आम्हाला दोन वेळचे अन्न आणि औषधोपचार तरी मिळेल. शहरात काहीच मदत मिळत नाही, ज्या ठिकाणी आम्ही रोजंदारीने काम करत होतो तिथल्या मालकाने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे, कोरोनाच्या प्रभावामुळे मजुरांनी घरची वाट धरली आहे. त्यामुळे, कोणतेही प्रवासाचे साधन नसताना या कामगारांनी पायी प्रवास सुरू केला आहे.
पायी निघालेल्या या मजुरांना घरी केव्हा पोहोचू याचीदेखील कल्पना नाही. रस्त्याने खाण्याची जी सोय उपलब्ध होईल, त्यावर भूक भागवत हे मजूर प्रवास करत आहेत. दरम्यान, भर उन्हात काही मजूर कुटुंब पायपीट करत कोनगावच्या हद्दीत आल्याची माहिती सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे यांना मिळताच त्यांनी या मजुरांची आज दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती.