ठाणे : भिवंडी शहरानजीक एका चाळीत मृत चिमुरडी कुटुंबासह राहात होती. तर तिच्या शेजारी नराधम राहतो. हा नराधम गेल्या १५ दिवसापूर्वीच शेजारी राहण्यास आला होता. त्यातच त्याने मृत चिमुरडीला कधी खाऊ तर कधी मोबाईल दाखवून जवळीक वाढवली. काल (रविवारी) सायंकाळच्या सुमारास मृत चिमुरडी घरासमोर खेळत होती. त्यावेळी या नराधमाने पीडितेला मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने घरात नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या केली.
आरोपीला शिताफीने अटक : दुसरीकडे मुलगी घराबाहेर न दिसल्याने घरातील कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु ती न मिळाल्याने तात्काळ निजामपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. पोलिसांनी तात्काळ परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले असता, त्यावेळी पोलिसांच्या लक्षात आले की, मुलीच्या घरापासून पाच-सहा घरे सोडून एक घर गेल्या अनेक तासापासून बंदच आहे. त्यामुळे घराची कौले काढून आतमध्ये डोकावून बघितले असता घरामध्ये नराधम व मुलगी दिसून आली. पोलिसांनी बंद घराचा दरवाजा तोडून मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला आणि या नराधमाला ताब्यात घेतले. त्यानंतर पंचनामा करत चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.
आरोपी बिहारचा रहिवासी : सदर नराधम हा मूळचा बिहार राज्यातील मधुबनी येथील रहिवासी आहे. निजामपूर पोलिसांनी या नराधमाच्या विरोधात कलम 302,366अ,376अ, 376ब, पोक्सो कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहे. या धक्कादायक घटनेचा तपास निमजपूर पोलीस करीत आहे.
ठाण्यातील बलात्काराच्या इतर घटना : पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाणे शहरात नोव्हेंबर, 2022 रोजी समोर आली होती. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल (case registered under the POCSO Act ) केला होता. मात्र यानंतर नराधम फरार झाला. त्याच्या शोधात पोलिसांचे पथके रवाना करण्यात आले होते.
कुटुंबासोबत जवळीक: आरोपी नराधम पीडित कुटुंबाचा बराच काळ मित्र होता. त्यामुळे पीडिता त्याला ओळखत होती. तो मजुरीचे काम करत इतर पाच सहकाऱ्यांसोबत पीडित मुलीच्या घरापासून २० मीटर अंतरावर एका खोलीत राहायचा. तो अनेकदा पीडित मुलीच्या घरी जायचा आणि कधी कधी पीडितेच्या आई-वडिलांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागल्यावर तिची काळजी घेत असे. टॅक्सी चालक म्हणून काम करणाऱ्या पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपी नराधमाला नोकरीच्या शोधात मुंबईत आल्यापासून अनेकवेळा मदत केल्याने पीडितेच्या आईवडिलांचा त्याच्यावर विश्वास होता.